प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा
इयत्ता - चौथी
विभाग - भाषा
घटक - आकलन
उपघटक - उतारा व त्यावर आधारित प्रश्न
उतारा हा एखाद्या लेखकाने लिहिलेला एक निवडक परिच्छेद असतो. उतारा हा एखादी घटना, वस्तू, व्यक्ती किंवा एखादा पशू, पक्षी व स्थळ यांचे केलेले वर्णन असते. उताऱ्याचे वाचन करताना उताऱ्यातील घटना, विचार व संवाद यातील प्रत्येक शब्द व वाक्य यांचा अर्थ समजून घेऊन त्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधायची असतात. उतारा वाचून व त्यावर आधारित प्रश्न वेळेत पूर्ण सोडविणे अपेक्षित असते.
- उतारा लक्षपूर्वक वाचा.
- उताऱ्यातील शब्दांचे अर्थ नीट समजून घेताना वाक्य पुन्हा पुन्हा वाचा.
- उताऱ्यातील आशय समजून घ्या.
- उताऱ्यातील प्रसंग, वर्णन, संवाद, घटना इ. मागील कार्यकारणभाव समजून घ्या.
- उताऱ्यातील माहितीच्या क्रमाने प्रश्नांचे क्रम असतीलच असे नाही.
- उत्तराचा पर्याय क्रमांक निवडताना उताऱ्यातील तेवढा भाग पुन्हा वाचून अचूक पर्यायाची खात्री करून घ्या.
नमुना उतारा
महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. लोकसेवेचे महान मंदिर या संतांनी महाराष्ट्रात उभारले. त्याचा पाया ज्ञानेश्वरांनी घातला. नामदेवांनी भिंती बांधल्या, एकनाथांनी त्यावर घूमट चढविला, तुकोबा त्याचे कळस झाले. त्या कळसावर गाडगेबाबांनी पताका चढविली. सर्व संताचे म्हणणे एक देव देवळात नाही पण माणसात आहे.
प्र. १) मंदिराचा पाया कोणी घातला ?
१) ज्ञानेश्वर. २) नामदेव. ३) एकनाथ. ४) गाडगेबाबा
प्र. २) मंदिरावर कळस कोणी चढविला ?
१) नामदेव २) ज्ञानेश्वर ३) एकनाथ. ४) तुकाराम
प्र. ३) महाराष्ट्र ही कोणाची भूमी आहे ?
१) लोकांची २) नेत्यांची ३) राष्ट्रपतीची ४) संतांची
